आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून २ यांत्रिक बोटींची खरेदी

सांगली, ता.३: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून दोन यांत्रिक बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसार शासनाच्या जेम पोर्टलमार्फत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर बोटी महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील सांगली व मिरज शहरांमध्ये पूरपरिस्थिती वारंवार निर्माण होते. मदतकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी मनपाकडे यापूर्वी ६ बोटी कार्यरत होत्या. मात्र मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाल्यास बोटींची कमतरता भासू नये, या उद्देशाने या दोन नवीन बोटींची भर करण्यात आली आहे. नवीन बोटींचे टेस्टिंग व प्रशिक्षण कृष्णा नदीत पार पडले. पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी व अग्निशमन दलाचे जवान या वेळी उपस्थित होते. प्रत्येकी ८ व्यक्तींची आसनव्यवस्था असलेली ही बोट ७ ते ८ जण सहज उचलू शकतात. आवश्यक साहित्य व दोरी ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पा असून ३० HP क्षमतेचे यामाहा कंपनीचे पेट्रोल इंजिन बसवलेले आहे.

बोटींचा उपयोग फक्त पूरपरिस्थितीत बचाव कार्यापुरता मर्यादित न राहता गणेशोत्सव काळात व इतर वेळी नदीपात्रातील शोध व बचाव मोहिमेसाठी होणार आहे.

नवीन बोटींच्या समावेशामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाची कार्यक्षमता अधिक वाढून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर व प्रभावी सेवा पुरविणे शक्य होईल.

मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल माळी
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button