
सांगली, ता.२: महात्मा गांधी जयंतीनिमित्त सांगली स्टेशन चौक येथे “स्वच्छता ही सेवा” उपक्रमाचा समारोप शपथग्रहण समारंभाने झाला. सलग पंधरा दिवस राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने “स्वच्छता ही सेवा” उपक्रमांतर्गत विशेष स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. १६ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा समारोप आज, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त सांगली स्टेशन चौक येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी एकत्रितपणे “स्वच्छता ही सेवा” शपथ घेतली. उपक्रमादरम्यान नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच विविध कार्यक्रम – सायकल रॅली, विद्यार्थी रॅली, स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या.
यावेळी या समारंभास अतिरिक्त आयुक्त रोकडे, उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, महापालिका सचिव अशोक माणकापूरे, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी व अतुल आठवले, सर्व स्वच्छता निरीक्षक, सिटी कॉर्डिनेटर, मुकादम तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.