
कुपवाड, ता.२४: पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहा वर्षीय मतिमंद मुलगी आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले. कुपवाड शहरातील आनंदनगर येथून एक दहावर्षीय मतिमंद मुलगी हरवली असल्याचा कॉल कुपवाड पोलिसांना आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तासाभरातच मुलीच्या आई-वडिलांना शोध घेऊन मुलीला सुखरूप स्वाधीन केले.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, मंगळवार (ता.२३) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुपवाड एमआयडीसी पोलिसांना एमडीटीवरून केतन कुमार झेंडे (रा. आनंदनगर, कुपवाड) यांनी एक दहा वर्षीय मतिमंद मुलगी हरवली असल्याचा कॉल केला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल हवालदार कोळेकर व पो. कॉ. कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्या मुलीला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. ती मुलगी नाव, पत्ता सांगू शकत नसल्याने कुपवाड स. पो. नि. भांडवलकर यांनी तातडीने नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर कुपवाड शहरासह परिसरात व संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता, संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील महात्मा फुले हाउसिंग सोसायटी येथे तिचे आई-वडील मिळून आले. खात्री पटवून त्या मुलीला त्यांच्याकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले.