आंधळं दळतंय, कुत्र पीठ खातंय, सध्याची कुपवाडची परिस्थिती
प्रशासनाचे नियोजन म्हणजे “आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय” याचा प्रत्यय कुपवाडच्या मुख्य रस्त्याच्या कामातून कुपवाडकरांना आला आहे. नियोजन शून्य कारभार, संवेदन शून्य अधिकारी व बेपर्वा ठेकेदार.. एकही अधिकारी जबाबदारीने काम करायला तयार नाही. सगळाच अंधाधुंद कारभार कुपवाड शहरात सुरु आहे. मंजूर झालेल्या सव्वा दोन कोटींचे मुख्य रस्त्याच्या कामापूर्वी व्यापारी संघटना, संघर्ष समितीने मनपा आयुक्तांना रस्त्याच्या बाजूचे जुने पोल व अतिक्रमण काढून एस्टीमेटप्रमाणे नियोजनबद्ध रस्ता करणेत यावा, अशी मागणी केली होती. यावेळी आयुक्तांनी हि संबंधीत अधिकाऱ्यांना अश्या सूचना दिल्या होत्या. तरीही या सूचनांना केराची टोपली दाखवून नियोजनशून्य निकृष्ट दर्जाचे काम सुरु असल्याचे नागरिकांनी हे काम निदर्शनास आणले. वास्तविक पाहता ढील पद्धतीने काम सुरु असल्याने ट्रॅफिकचा नाहक त्रास येथील प्रवाश्यांना सहन करावा लागत आहे. नियमाप्रमाणे या रस्त्याच्या मध्यबाजूपासून नऊ मीटर हा रस्ता करणे अपेक्षित आहे, तरीही काही ठिकाणी यात कमी माप भरल्याचे दिसून आले, ही अत्यंत निंदनीय व अशोभनीय बाब असून जनतेचा पैसा लुटण्याचा प्रकार आहे. तरी मनपा आयुक्तांनी त्वरित या रस्त्याच्या कामाची दखल घेऊन असणाऱ्या त्रुटी दूर करून एस्टीमेटप्रमाणे हे काम पुढे सुरु करण्याच्या सूचना द्यावेत, अन्यथा काही दिवसांत कुपवाडमधून नागरिकांचा रोष हा प्रशासनाला पाहायला मिळेल.
