
हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून मागणी
कुपवाड : अवधूत कॉलनी येथे बामणोली शिवाजीनगर येथील वसगडे कुटूंबाला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याकडून जवळपास सहा लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याने दिलेली रक्कम परत मागण्यासाठी वसगडे हे अमोल ढोबळे यांचा घरी गेले असता अमोल ढोबळे यांचे वडील ज्ञानोबा ढोबळे यांनी देवानंद वसगडे यांना काठीने मारहाण करत त्यांचावर जीवघेणा हल्ला केला.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कुपवाड शहर अध्यक्ष देवानंद वसगडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पिता-पुत्रावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हंटले आहे की, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कुपवाड शहर अध्यक्ष देवानंद वसगडे यांच्या मुलाला सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळण्यात आले. त्यानंतर नोकरी लावण्याबाबत टाळाटाळ करत पैसेही परत देण्यास नकार देण्यात आला. पैसे मागितले असता देवानंद वसगडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये वसगडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. मिरजेत खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत. पहाटेपासून वृत्तपत्र विक्री करण्यासाठी राबणाऱ्या या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
वसगडे यांच्यावर हल्ला करून उलट संशयितच स्वतावर हल्ला झाल्याचा फिर्याद देत बनाव करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एवढ्यावर न थांबता अन्य मार्गाने जखमीवरच दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरी याबाबत गांभीर्यपूर्वक घेऊन संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या हल्लेखोराच्या मुलाचा शोध घेऊन त्याला अटक करावी.
यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे, माजी कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर, सचिव विशाल रासनकर, मनपा क्षेत्र अध्यक्ष दिपक वाघमारे, नारायण माळी, दादासो गुरव, निलेश कोष्टी, बाळासाहेब पाटील आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
कडक कारवाई करु, कुटुंबाला त्रास होणार नाही. वसगडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात येत आहे. जखमी वसगडे यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील तक्रार, जबाब घेऊन अधीक कारवाई करु. नोकरीच्या आमिषाने पैसे लुबाडल्याबाबत तक्रार येत आहेत, लवकरच त्याचा शोध घेऊन अटक करु.वसगडे कुटुंबाला संबंधितांकडून पुन्हा त्रास होणार नाही याकडे पोलिसांचे लक्ष राहील.
दिपक भांडवलकर सहा.पोलीस निरीक्षक कुपवाड पोलीस ठाणे