
कुपवाड, ता.२३ : अंमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियान व कन्या सबलीकरण योजनेतंर्गत सौ.आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थीनींच्या कराटे प्रात्यक्षिक वर्गास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.
विद्यार्थिनींनी नशामुक्ती प्रतिज्ञा घेतली. न्यू प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी प्रसाद धोतरे याने व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक गीत सादर केले. मुख्याध्यापक कुंदन जमदाडे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यांचे प्रबोधन करणेत आले. कन्या सबलीकरण योजने अंतर्गत विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण वर्गास भेट देणेत आली. यावेळी विद्यार्थिनींनी लाठी-काठी, कराटे, बॉक्सिंग इ. नेत्रदिपक प्रात्यक्षिके सादर केली. तसेच नशामुक्ती अभियाना अतंर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स व निबंध लेखन प्रदर्शनास भेट देवून कौतूक केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. व्यसनमुक्तीचे कार्य संस्था अनेक वर्षांपासून करत असल्याचे जाणून घेत कौतुक केले. मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी जिल्हात पाच हजार मुलींचे एक विशेष पथक लवकर तयार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदिप घुगे, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, विस्तार अधिकारी रामचंद्र टोणे, वेतन पथक अधिक्षक रियाज शेख, सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर, संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, कांचन उपाध्ये, पुनम उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.