
सांगली, ता.२० : तात्पुरत्या निवारा केंद्रांसाठी पाच ठिकाणे अधिग्रहीत जिल्ह्यातील अनेक भागात असलेला पाऊस, धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे असलेले जास्त प्रमाण यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयर्विन पूलाच्या ठिकाणची कृष्णा नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमिवर पूरग्रस्त स्थलांतरीत नागरिकांकरिता तात्पुरती निवारा केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी एकूण पाच मंगल कार्यालय, सांस्कृतिक भवन पूर कालावधीकरिता अधिग्रहीत केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
मंगल कार्यालये/ सांस्कृतिक भवनाचे नाव, ठिकाण व पत्ता पुढीलप्रमाणे....
सहकार भवन, मार्केट यार्ड सांगली, रोटरी क्लब हॉल, गणेश नगर सांगली, माळी मंगल कार्यालय, लक्ष्मी मंदिर चौक कुपवाड, कल्पतरू मंगल कार्यालय, टिंबर एरिया, उत्तर शिवाजीनगर सांगली व कच्छी भवन, राम मंदिर चौक सांगली.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ६५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.