
सांगली, ता.९: आंतरराष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातील खेळाडूंसाठी (ता.१२) रोजी विभागीय निवड चाचणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीसाठी खेळाडूंना (ता.११) रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे उपस्थित रहावे लागणार आहे. कागदपत्रांची पूर्तता व जन्म दिनांकानुसार पात्र होत असणाऱ्या जास्तीत जास्त व्हॉलीबॉल खेळाडूंनी या चाचणी मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारा World School Volleyball (U-१५ Boys & Girls) Championship स्पर्धा ४ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये शांग्लूओ-चीन या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा संघ सहभागी होणार आहे. भारताच्या संघ निवडीसाठी शालेय खेळ महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणी २५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्य निवड चाचणी आयोजन पुणे येथे करण्यात येणार आहे.
निवड चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा जन्म १ जाने २०१० या तारखेस किंवा त्यानंतर झालेला असावा मात्र १ जानेवारी २०१० पूर्वी व १ जानेवारी २०१४ रोजी व त्यानंतर जन्मलेले खेळाडू चाचणीसाठी पात्र असणार नाहीत. निवड चाचणीसाठी शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्म दिनांकाचा इंग्रजीमधील दाखला, राष्ट्रीय निवड चाचणीवेळी किमान ६ महिने व्हॅलिडीटी (Validity) शिल्लक असलेला भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे. ज्या खेळाडूंकडे पासपोर्ट नसेल त्यांनी विभागीय निवड चाचणी वेळी पासपोर्ट विभागाकडे तात्काळ पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागेल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.