
सांगली, ता.९ : सांगली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑगस्ट २०२५ रोजीच्या बैठकीत काळी-पिवळी मीटर्ड टॅक्सी, जीप सदृश्य टॅक्सी (मीटर नसलेल्या) व ऑटो रिक्षा या प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित झाली आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळवले आहे.
काळी-पिवळी मीटर्ड टॅक्सी, जीप सदृश्य टॅक्सी (मीटर नसलेल्या) व ऑटो रिक्षा या प्रवासी वाहनांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे.
पेट्रोल आणि डिझेल ऑटोरिक्षा मूळ नोंदणी तारखेपासून १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील. जे परवानाधारक पेट्रोल ऑटोरिक्षा मूळ नोंदणी तारखेपासून १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एलपीजी अथवा सीएनजी इंधनावर रुपांतरीत करून घेतील अशा रिक्षा मूळ नोंदणी तारखेपासून २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील.
एलपीजी व सीएनजी इंधनावर चालणाऱ्या अॅटोरिक्षा मूळ नोंदणी तारखेपासून २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील. मीटर टॅक्सी व मीटर नसलेल्या जीप सदृश्य टॅक्सी त्यांच्या प्रथम नोंदणी तारखेपासून २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.