
कुपवाड, ता.५ : पुणे येथील चिखले येथे वारंवार पैसे व दागिन्यासाठी तगादा लावून सासरच्यांकडून सुनेला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. सदर घटना १७ मे २०२५ ते ९ जून २०२५ चे दरम्यान पतीच्या घरी म्हेत्रे सोसायटी, पार्वती कॉम्प्लेक्स, चिखली, येथे घडली आहे. याबाबत पल्लवी प्रमोद मडके, वय २१ वर्षे, रा. म्हैत्रे सोसायटी, पार्वती कॉम्प्लेक्स, चिखली, पुणे सध्या रा. गणेश नगर, बामनोळी, ता.मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पती प्रमोद रामराव मडके वय २९ वर्ष, सासू सुलक्षणा रामराव मडके वय ६० वर्षे, दोघे राहणार मेहेत्रे सोसायटी पार्वती कॉम्प्लेक्स चिखली पुणे, आणि ननंद प्रतिभा आगलावे, वय ४१ वर्ष, रा. कृष्णा नगर, चिखली, पुणे यांच्यावर कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, १७ मे २०२५ ते ९ जून २०२५ चे दरम्यान म्हेत्रे सोसायटी, पार्वती कॉम्प्लेक्स, चिखली, पुणे येथे पत्नी पल्लवी मडके यांना पती प्रमोदने केसे धरून हाताने मारहाण केली. नवीन गाडी घेण्याकरता पल्लविकडे वीस लाखांची मागणी केली. फिर्यादीच्या सासू सुलक्षणा यांनी ही सुनेला सोडले नाही त्यांनी ही सुनेला ओरबाडून मारहाण करत तिचा लग्नातील दागिने काढून घेतले. ननंद प्रतिभा आगलावे हिने पल्लवीने लग्नामध्ये गाडी दिली नाही आणि पाहुणचार नीट केला नाही या कारणाने पल्लविला शारीरिक व मानसिक त्रास दिला. सासरच्या त्रसाला कंटाळून अखेर पल्लवीने सोमवारी रात्री सासू, ननंद व पती या तिघांवर पैशाची मागणी व मारहाण केल्याची तक्रार कुपवाड पोलिसात केली. तक्रारीवरून या तिघांवर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापुढील अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहे.