
नागाव, ता. २४ : देव दर्शन घेऊन परत येताना काळाचा घाला झाला. तरुणाचा अंगावरून दुधाचा टँकर गेल्याने तासगावचा तरुण जागीच ठार झाला. आपघातातील मृत तरुणाचे नाव कौशिक दिलीप सासणे (वय २५, रा. तासगाव, जि. सांगली) असे आहे. हा अपघात गुरुवार (ता.२४) पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाट्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. कौशिक मित्रांसोबत आदमापूर येथून बाळूमामांचे दर्शन घेऊन परत येत असताना हा आपघात झाला.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कौशिक हा आपल्या तिघा मित्रासोबत गुरुवार (ता.२४) रोजी सकाळी दुचाकीवरून अमावास्यानिमित्त आदमापूरला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना कौशिक दुचाकी (एमएच १० डीएफ ०२२१) वरून चालला होता महामार्गावर सायंकाळी पाचच्या सुमारास नागाव फाट्यावर मोटार अचानक थांबताच कौशिकचे मोटारसायकल वरील नियंत्रण सुटून मोटारीला मागून धडक दिली. धडकेत कौशिक व त्याचा मित्र रस्त्यावर पडताच मागून भरधाव येणाऱ्या टँकर (एमएच ०९ एफएल १८१९) खाली कौशिक सापडला. कौशिकचा साथीदार थोडक्यात बचावला. अपघातानंतर मोटारचालकाने पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.