
कुपवाड : रामकृष्णनगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ मंगळवार (ता.२२) मद्यरात्री अमोल सुरेश रायते वय ३४ वर्ष, रा. रामकृष्णनगर, कुपवाड याच्यावर कुऱ्हाड व चाकूने डोक्यावर, तोंडावर, छातीवर व पोटावर सपासप वार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
प्रेम बाळासाहेब मद्रासी (वय २४) आणि तेजस संजय रजपूत वय २५ वर्ष, दोघे रा. रामकृष्णनगर, कुपवाड व निहाल आसिफ बावा वय २० वर्ष, रा. शामराव नगर, सांगली असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल रायते या तरुणाचा स्वामी समर्थ मंदिरासमोर मंगळवार (ता.२२) मद्यरात्री धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना बुधवार (ता.२३) उघडकीस आली. याबाबत कुपवाड पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. संशयित आरोपीचा शोधासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांचे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक रवाना झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस सागर लवटे आणि अमीरशा फकीर यांना गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे तानंग रोड सावळी येथे असल्याने स्थानिक शाखेचे पथकाने सदर ठिकाणी प्रेम मद्रासी व तेजस राजपूत यांना ताब्यात घेतले. सदर घटनेबाबत विचारले आसता प्रेम मद्रासी याने सांगीतले की, अमोल रायते हा त्याचे पत्नीबाबत अपशब्द वापरत असल्यामुळे वाद झाल्याने प्रेम व त्याचे साथीदार तेजस रजपूत आणि निहाल बावा असे तिघांनी मिळून चाकू आणि कुऱ्हाड या धारदार शस्त्राने अमोल रायतेवर वार करुन जखमी करुन खून केला असल्याची कबूली दिली.
सदर आरोपींना पुढील तपासासाठी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कुपवाडचे सपोनि दीपक भांडवलकर यांच्या पथकाने निहाल बावाला ताब्यात घेतले. अमोल खून प्रकरणी कुपवाड पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर हे करीत आहे.