
विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान बामणोली संस्थेची कौतुकास्पद कामगिरी
बामणोली, ता.२१ : ‘हम होंगे कामयाब…. हम होंगे कामयाब’ विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान बामणोली यांच्यामार्फत चालू असलेल्या विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यां विद्यार्थिनींचे हे गुंजन शनिवार (ता.१९) रोजी झालेल्या शालेय साहित्य वितरणाच्या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर व उपस्थितांच्या मनावर कोरले गेले.
या योजने अंतर्गत ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालक म्हणजेच आई वडील किंवा दोघेही यांचे छत्र हरपल्यामुळे बिकट आर्थिक स्थितीचा सामना करावा लागतो व त्यामुळे शैक्षणिक अडचणी निर्माण होतात. अनेक विद्यार्थ्यांना काही करणास्थव बऱ्याचदा शिक्षण अर्धवट सोडावे लागते अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान बामणोली या संस्थेकडून विद्यार्थी पालकत्व योजना चालवली जाते. या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन शिक्षणासाठी आवश्यक असणारे शालेउपयोगी साहित्य विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान या संस्थेमार्फत पुरवले जाते.
१४ वर्षात संस्थेने पालकत्व मार्फत केलेली कामगिरी
संस्थेने गेल्या १४ वर्षांत साडेचारशे हून अधिक विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले असून साडेतीनशेहून जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या संस्थांमध्ये नोकरी मिळवून आर्थिकरित्या स्थिरता मिळवली आहे. शनिवार (ता.१९) रोजी योजनेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे विश्वस्त व या योजनेचे प्रमुख श्री मंदार बन्ने आणि कार्यालय प्रमुख सौ रोहिणी रत्नपारखी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्रीराम कानिटकर तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ संपदा कानिटकर आणि सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. शहर कार्यवाह श्री राजू शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय संस्थेचे सचिव व वैद्यकीय संचालक डॉ. राम लाडे यांनी केले. दहावी व बारावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. योजनेमध्ये पहिली पासूनचा विद्यार्थी भरत रघुनाथ माने, ज्याचे शिक्षण आयटीआय पर्यंत झाले व ज्याची सध्या महिंद्रा या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्यू मधून निवड झालेल्या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. आदित्य तोडकर या विद्यार्थ्याचे पालक अपघातानंतर अंथरुणाला खिळून बसले असून कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. या विद्यार्थ्याचे योजनेतूनच सायन्समधून बारावीचे शिक्षण घेत आहे. माधवी मुळे हिने ही आपले मनोगत व्यक्त केले. माधवी ही इएनटीसी या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात शिकत असून ह्या योजनेमुळे तिला हे शिक्षण घेणे शक्य झाले आहे. माधावीचे मनोगते ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. यानंतर मान्यवरांचे मनोगत झाले आणि त्यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद हॉस्पिटल च्या एच आर मॅनेजर सौ. तेजस्विनी वाटवे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मंदार बन्ने यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने या योजनेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान व विवेकानंद हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच विश्वस्त व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.