मिरज / प्रतिनिधी

मिरज, ता.२० : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयास विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आत्तापर्यंत सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य आ. इद्रिस नायकवडी यांच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याद्वारे मिरज शासकीय रुग्णालयात विकास कामे झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयात विकास कामे
मिरज शासकीय रुग्णालय येथे अत्याधुनिक ऑपरेशन थेटर, मॉड्युलर आयसीयू, डिजिटल लायब्ररी, डिजिटल सबस्ट्रक्शन मशीन साठी ४० कोटी रुपये, नर्सिंग महाविद्यालय, परिचारिका वसतिगृहे, मेडिकल विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहे, एसटीपी प्रकल्प, भूमिगत ड्रेनेज योजना, येथील वस्तीगृहांची दुरुस्ती, कॅथलॅब, लेक्चरर हॉल, प्रात्यक्षिक हॉल आदी सुविधा या २०० कोटी रुपये निधीतून या ठिकाणी उपलब्ध होत आहेत.
लोकार्पण सोहळा
नूतन शस्त्रक्रिया गृह व डीएसए मशीनचा लोकार्पण सोहळा, एसटीपी प्रकल्प (भुयारी योजना) कार्यारंभ; वसतिगृह, अंतररुग्ण, बाह्यरुग्ण विभाग दुरुस्ती कार्यारंभ आदी कार्यक्रम सोहळा सोमवार दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे.
महादेवदादा दबडे
राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेसाठी विकास योजना राबविण्याचे पक्षाचे ध्येय धोरण आहे. आ. इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज आणि परिसरातील विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा मिरजेशी विशेष जिव्हाळा आहे. येथील शासकीय रुग्णालय हे जिल्हासह पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते. त्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन या ठिकाणी निधी देऊन सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख आभार व्यक्त केले.