
भिलवडी, ता.१९ : येथे एक अत्यंत दुर्दवी घटना घडली आहे. एक सहा वर्षीय शाळकरी चिमुकला शाळेतून परतत असताना भरधाव डंपरने धडक दिल्याने चिमुकला ठार झाला आहे. सदर घटना शनिवार सकाळी घडली आहे. राज वैभव पवार (वय ६, रा. लोहार गल्ली, भिलवडी) असे या आपघातात मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत भिलवडी पोलीसांत अपघाताची नोंद झालेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नेहमीप्रमाणे राज शनिवार (ता.१९) रोजी शाळेला गेला होता. राज इयत्ता पहिलीत शिकत होता.काल तो शाळेतून सकाळी साडेअकरा वाजता शाळा सुटल्यानंतर आईसोबत घरी परतत असताना नवीन सरळी पुलानजीक मुरमाने भरलेल्या भरधाव डंपरने (एमएव १०. एडब्ल्यू १७२९) त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत राजच्या डोक्याला, पायाला गंभीर इजा व दुखापत झाली. नागरिकांनी तात्काळ नजदिकच असणाऱ्या आयुष्यमान आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्याचे मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर डंपरचा चालक पसार झाला असून, त्याच्यावर भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील अधिक तपास पोलीस करीत आहे.