
मोबदल्यासाठी संपर्क साधावा–जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, ता. ११ : राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (एच) अंतर्गत पेठ ते सांगली रस्त्याचे भूसंपादनाचे निवाडे पू्र्ण झाले असून, निवाडे अंतिम होऊन एकूण ७०६ जमीनधारकांना नुकसानभरपाई संदर्भात नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित जमीनधारकांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग १६६ (एच) अंतर्गत पेठ नाका ते सांगली रस्त्याची एकूण लांबी ४१.२६० कि.मी. असून, आवश्यक भूमी संपादनाचे निवाड्याचे कामकाज उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १) यांनी तीन महिन्यापूर्वी पूर्ण केले आहे. एकूण १२ निवाड्यांपैकी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मौजे तुंग, कसबे डिग्रज व उरूणच्या ६ निवाड्यांना मान्यता दिली आहे व त्याचा निधी उपलब्ध झाला आहे. एकूण ७०६ खातेदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नुकसान भरपाई स्वीकारण्याकामी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे त्यांनी सांगितले.
भूसंपादनाच्या निवाड्यामध्ये प्रारंभी मौजे तुंग, कसबे डिग्रज आणि उरूण अशा तीन बाधित गावांतील एकूण ४७ गट असून एकूण ०.४५३५१ हेक्टर आर क्षेत्र आहे. नोटिसांची संख्या ७०६ असून एकूण रक्कम ५ कोटी ९० लाख १५ हजार ५९० रूपये इतकी आहे. या अनुषंगाने संबंधित जमीन धारकांस मोबदला देण्याच्या दृष्टीने तहसीलदार, तलाठी यांच्यामार्फत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांनी नोटिशीत नमूद आवश्यक कागदपत्रांसह नुकसान भरपाई रक्कम स्वीकारण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
प्रथम टप्प्यातील गावनिहाय एकूण गट संख्या, क्षेत्र, नोटीस संख्या, एकूण रक्कम पुढीलप्रमाणे -
- तुंग गावातील एकूण 4 गट असून एकूण 0.0060 हेक्टर आर क्षेत्र आहे, नोटिशींची संख्या 20 असून एकूण रक्कम 1 लाख 70 हजार 49 रूपये इतकी आहे.
- कसबे डिग्रज गावातील एकूण 39 गट असून एकूण 0.37551 हेक्टर आर क्षेत्र आहे, नोटिशींची संख्या 638 असून एकूण रक्कम 5 कोटी 75 लाख 54 हजार 698 रूपये इतकी आहे.
- उरूण गावातील एकूण 4 गट असून एकूण 0.0720 हेक्टर आर क्षेत्र आहे, नोटिशींची संख्या 48 असून एकूण रक्कम 1 लाख, 29 हजार 843 रूपये इतकी आहे.
मौजे पेठ, इस्लामपूर, उरूणचे उर्वरित गट यांचे नुकसान भरपाईचे निवाडे मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांची मान्यता प्राप्त होताच संबंधितांना नुकसान भरपाई मोबदल्याची कार्यवाही त्वरित करण्यात येईल. या सर्व भूसंपादन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. 1) अजय पवार यांनी स्पष्ट केले आहे.