
अंकली, ता.१ : कृषी दिनाच्या दिवशी, शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समिती, सांगली यांच्या वतीने सांगली–कोल्हापूर मार्गावरील अखंड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी या महामार्ग रोको आंदोलनात सहभाग घेतला व सरकारच्या भूमी अधिग्रहणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. हे आंदोलन फक्त रास्त मागण्यांसाठी नाही, तर शेतीच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे.
महामार्गाचे नियोजन करताना शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावले जात आहे. ज्यांच्या कष्टावर देश उभा राहतो, त्यांचं भविष्य मात्र सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे अंधारात जात आहे. विकासाच्या नावाखाली जर शेतकरीच उघड्यावर पडत असेल, तर असा विकास स्वीकारणं अशक्य आहे. शासनाने विकासाची दिशा ठरवताना शेतकऱ्यांचा आवाज ऐकणं गरजेचं आहे. जमीन जात असेल, तर न्याय्य भरपाई हवी. पुनर्वसनाची स्पष्ट हमी हवी. आणि शक्य असल्यास, जमीन पर्याय देखील द्यावा. अन्यथा, ही असंतोषाची ठिणगी पेटून मोठं आंदोलन होईल, याची सरकारने नोंद घ्यावी.
यातील मुख्य मागण्या
- जमिनी मोजणी सुरू करण्यापूर्वी पूर्ण, न्याय्य भरपाई निकषांचा खुलासा. (मागील रकाने ४००+ शेतकरी, ४० हेक्टर जमिनीसाठी नोटिस दिलेली होती)
- भू-अधिग्रहणाचे निर्णय घेण्यापूर्वी पर्यायभरपाई, पुनर्वसन व जमीन पर्यायांची हमी
- महापुराचा धोका वाढण्याची चिंता, जैवविविधता आणि शेतीचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घ्यावेत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. पण शेतकऱ्यांचं नुकसान आणि विनाश झालेलं आम्ही कधीही सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी हा लढा चालूच राहील.