जत :- प्रतिनिधी

जत, ता.२९ : जत तालुक्यातील साळमळगेवाडीत पंधरा लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. सदर कारवाई जत पोलिसांनी केली. संजय प्रभाकर गिरीबुवा वय ५०, रा. साळमळगेवाडी यांच्या शेतात बेकायदेशीर पणे लागवड केलेली गांजाची सतरा झाडे पोलिसांनी कारवाई करून जप्त केली. अंदाजे दीडशे किलो वजन असून सुमारे पंधरा लाख रुपये इतकी किंमत होते. जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गुरुवार (ता.२६) रोजी जत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून संजय प्रभाकर गिरीबुवा यास ताब्यात घेतले. याबाबत गिरीबुवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार जत येथील साळमळगेवाडीत संजय गिरीबुवा यांनी आपल्या शेतात गर्द झाडीच्या अडोशात गांजाची शेती केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिस अधीक्षक संदीप घुगे व पोलिस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जतचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर व त्यांच्या पथकांकडून साळमळगेवाडी येथील गिरीबुवा यांच्या शेतात छापा टाकला. गिरीबुवा यांच्या शेतात एकूण सतरा गांजाची झाडे लागवड केल्याची निदर्शनास आले ती झाडे पोलिसांकडून जप्त करण्यात आली. रात्रीउशिरा पर्यंत जप्त केलेल्या गांजाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिसांकडून दीडशे किलो इतका गांजा जप्त केल्याची अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्याची सुमारे पंधरा लाख रुपये किंमत होईल, असेही सांगितले. मात्र, याची अधिकृत पणे नोंद जत पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. सदर कारवाई विक्रम गोदे, विनोद सकटे, सुभाष काळेल, राजू सावंत, सय्यदअली मुल्ला, तोहीद मुल्ला, आदी पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.