
सांगली, ता. २६ : २५ जून देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगावा लागलेल्या सांगली जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानींचा सत्कार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. यावेळी आयोजित या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण
भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाही रक्षणार्थ जिल्ह्यातील ७१ लोकतंत्र सेनानींनी सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी कारावास भोगला होता. त्यांच्या या योगदानाबद्दल या व्यक्तिंना सन्मानपत्र देऊन गौरविण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. उपस्थित ४७ व्यक्तींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी आणीबाणी कालावधीत लोकशाही लढ्यात सहभागी घेतला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी व प्रगल्भ आहे. या लोकशाहीचे रक्षण करण्याप्रती सर्वांनी कटिबध्द रहावे, असे ते म्हणाले. यावेळी अण्णासाहेब डांगे, श्रीकांत शिंदे, प्रदीप ओगले यांनी मनोगतात त्यावेळचे अनुभव कथन केले. यावेळी उपस्थित लोकतंत्र सेनानींचा सत्कार सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.