
सांगली, ता. २६ : देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणीबाणी कालावधीत नागरिकांचे मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्यावर बंधने लादली गेली होती. या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकशाही रक्षणार्थ आणीबाणीतील घडामोडींवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रंथालयात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, तहसिलदार लीना खरात यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
देशात 1975 ते 1977 या कालावधीत आणीबाणी लागू करण्यात आली
या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत अनेक जणांनी योगदान दिले, तुरूंगवास भोगला. या अनुषंगाने या प्रदर्शनात विविध घडामोडींची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. प्रदर्शनातून लोकशाहीचे महत्त्व, आणीबाणी कालावधीतील संघर्ष, व त्याचे विविध पैलू यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुरातन काळापासून भारतात सुरू असलेली लोकशाही व्यवस्था, आणीबाणी लावल्यानंतर प्रसिध्द झालेले राजपत्र, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, सरकारच्या विरोधात जनआंदोलन, आणीबाणी संपल्यानंतर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेली पावले आदिंचा यात समावेश करण्यात आला आहे.

हे प्रदर्शन आजपासून एक महिना सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व माहिती विभागातर्फे करण्यात आले आहे.