
सांगली, ता. २५ : विश्रामबागला डंपरच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना मंगळवार (ता.२४) रोजी सकाळी साडे दहा च्या सुमारास घडली . आपल्या पतीसोबत दुचाकीवरून कामावर निघाली असताना विश्रामबाग उड्डाणपुलावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जीव गेला. तर या आपघातात मृत झालेल्या पत्नीचे नाव पूनम गोविंद नलवडे (२५, रा. कवलापूर, ता. मिरज) असे आहे. दीड वर्षांपूर्वी पूनम आणि सुशांत यांचा विवाह झाला होता. पूनम विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात काम करत होती. या अपघातात पती सुशांत जाधव हाही जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरचालकास पकडून चोप दिला. ही घटना समजताच घटनास्थळी संजयनगर पोलिसांनी धाव घेतली व डंपरचालक श्रीकांत नंदकुमार लमाण (रा. जत) याला ताब्यात घेतले.या घटनेचे रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पूनम व सुशांत दोघे दुचाकी (एमएच १०, डीएन ५१००) वरून कामासाठी मंगळवारी साडेदहाच्या सुमारास कुपवाडकडून विश्रामबागकडे येत होते. त्यावेळी पूल चढतानाच मागून भरधाव वेगाने काँक्रिट मिक्सरचा डंपरने (एमएच १७, बीडी ९१२२) पाठीमागून जोराची धडक पूनम व सुशांतच्या दुचाकीला दिल्याने पूनम चाकाखाली सापडली. पुनमच्या अंगावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सुशांत हा जखमी अवस्थेत पडला. ही घटना पाहुन नागरिकांनी धाव घेत डंपरचालकाला अडवून नागरिकांनी चांगलाच चोप दिला.
यावेळी संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचारापूर्वीच पूनमचा मृत्यू झाल्याचे वैधकीय अधिकारी यांनी घोषित केले. या घटनेची माहिती कवलापूर परिसरात कळल्यानंतर शोककळा पसरली. डंपर चालकावर रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. यापुढील अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहे.