प्रतिनिधी मिरज :

खटाव ग्रामपंचायतीतील अनियमिततेच्या चौकशी अहवालाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तत्काळ पाठवण्यात यावी, अन्यथा शुक्रवारपासून गटविकास अधिकारी कार्यालयासमोर शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
ग्रामसेवक संजयकुमार गायकवाड यांनी अनेक ग्रामपंचायती कामांमध्ये अपारदर्शकता आणि स्वतः ठेकेदार म्हणून सहभाग घेतल्याचे आरोप करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली होती. यानुसार मिरज गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून संबंधित प्रकरणाची चौकशी केली. समितीचा अहवाल टपाल विभागात जमा करण्यात आला असून, तो गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे.
मात्र, अहवाल पाठवण्यास विलंब होत असल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यावर "अजून आठ दिवस लागतील," असे सांगितले. यावर शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे परशुराम बनसोडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि दोन दिवसांत अहवाल पाठवला गेला नाही, तर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असे जाहीर केले.
गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर शरद यमगर, श्रीकांत यमगर, अण्णासाहेब देशमुख, अविनाश मसाळ, हनुमंत कांबळे यांचीही स्वाक्षरी आहे.
दरम्यान गोपनिय चौकशी अहवालाची माहिती संबंधित ग्रामपंचायत अधिकारी संजय गायकवाड यांना शिवानंद कोळी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पंचायत समितीत मोठी खळबळ उडाली आहे. विस्तार अधिकारी कोळी यांनी मा मुख्य कार्यकारी अधिकारीसो व उप मुख्य कार्यकारी अधिकारीसो यांचेवर दबाव आणण्यासाठी सदरचा गोपनीय अहवाल दिला आहे.. याबाबत विस्तार अधिकारी कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी मा मुख्य कार्यकारी अधिकारीसो जिल्हा परिषद सांगली यांना स्वतंत्रपणे निवेदन सादर करण्यात येणार आहे.