
सांगली, ता. १९ : राजर्षि शाहु महाराज जयंती पर्व दि. २६ जून २०२५ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. वैधता प्रमाणपत्राअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयात त्वरित अर्ज करावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी (३ वर्षे/ ५ वर्षे विधी) व बी. एड. इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग तसेच एसईबीसी (मराठा) या प्रवर्गातील आरक्षण अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम व नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः ३ ते ६ महिन्यांचा कालावधी समिती निर्णयाकरिता असतो, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.