
सांगली, ता.१९ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ पदभरती करिता आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक १ ते ८ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ पदे भरती करिता दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्याकरिता, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी. एस. कंपनीस नियुक्त केले आहे व त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दिनांक २२ एप्रिल २०२५ ते दिनांक १६ मे २०२५ दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत. या परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉल तिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे.
या परीक्षेकरिता नोंदणी व मुद्रांक विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची किंवा मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही. याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.