
सांगली, ता.१३ : शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गांभीर्याने कार्यवाही करावी. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण कराव्यात, सुरू असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पांसाठी टप्पेनिहाय वेळापत्रक तयार करावे व कालमर्यादा निश्चित करून ते प्रकल्प प्राधान्याने कार्यान्वित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषि वाहिनी ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रात्रीचे अपघात टळतील. बळीराजा मोफत वीज योजनेतून ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज मिळणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून एकूण 47 जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यापैकी 29 जागांचे क्षेत्र आवाडा या कंपनीस हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्यातून 207 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे.