
सांगली, ता.९ :उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी औद्योगिक संघटना व शासकीय विभाग यांनी परस्पर समन्वय ठेवावा. औद्योगिक वसाहतीत मूलभूत सोयी सुविधा द्याव्यात. कालमर्यादा ठरवून उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवार (ता.९) यांनी दिल्या. उद्योग विभागाच्या विविध समित्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, महापालिका उपायुक्त वैभव साबळे, ईएसआयसीचे संतोष माळवी यांच्यासह उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासंदर्भात संबंधित यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन सदर प्रकल्पात सहभागी होण्यास इच्छुक घटक, प्रकल्प चालवण्याची जबाबदारी आदिंबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, पावसाळा लक्षात घेता औद्योगिक वसाहतीतील खड्डे बुजवावेत. कुपवाड मिरज औद्योगिक वसाहतीत महावितरणचे सबस्टेशन स्थापित करण्यासाठी जागावाटपाची कार्यवाही करावी. बंद एलईडी पथदिवे सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या विद्युत विभागाने तातडीने कार्यवाही करावी. ईएसआयसी रूग्णालय स्थापित करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करून स्वतंत्र बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
रांजणी ड्राय पोर्ट, मिरज तंतुवाद्य क्लस्टर, कवलापूर विमानतळ आदि बाबींचाही आढावा यावेळी घेतला. जिल्हा निर्यात प्रचालन समितीपुढे ईवाय कन्सल्टन्सीचे श्रीजीत नायर यांनी सादरीकरण केले.
जिल्ह्यात तंतुवाद्य, बेदाणे, हळद या जी. आय. मानांकन प्राप्त बाबींच्या अनुषंगाने व अन्य निर्यातक्षम उत्पादनांच्या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांसोबत जूनच्या शेवटच्या आठवड्यात बैठक आयोजित करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.
औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, कुपवाड मिरज औद्योगिक वसाहतीत महावितरणचे सबस्टेशन, औद्यागिक वसाहती अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, गतिरोधक, पथदिवे तसेच औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत सुविधा, ESIC रुग्णालय, कचरा डेपो, अतिक्रमणे या बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील, संतोष भावे, अनंत चिमड, संजय अराणके यांच्यासह जिल्ह्यातील इतर औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.