नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थींचे तुरची येथे सोमवारी दीक्षांत संचलन

सांगली, ता.७ : नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थी सत्र क्र. १० यांचा दीक्षांत संचलन समारंभ सोमवार (ता.९) जून २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

प्रमुख पाहुणे

या सोहळ्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके प्रविणकुमार पडवळ हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सांगली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची चे प्राचार्य धीरज पाटील यांनी दिली.

नवप्रविष्ठ महिला पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्र. १० यांचे प्रशिक्षण सत्र (ता.१०) ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवड झालेल्या ४८१ महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश असून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी ३९ टक्के महिला प्रशिक्षणार्थी पदवीधर व ५ टक्के पदव्युत्तर आहेत.

नऊ महिने कालावधीत

नऊ महिन्याच्या कालावधीत त्यांना आंतरवर्गात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि स्थानिक विशेष कायदे, फॉरेन्सीक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र तसेच बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव, ऑब्स्टॅकल, जमाव नियंत्रण, योग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पोलीसांनी जनतेप्रती संवेदनशील बनावे याकरिता ‘भावनिक प्रज्ञावंत पोलीस’ हा विषय समाविष्ठ करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थीना परिपूर्ण पोलीस बनविण्यासाठी CCTNS, AMBIS, E-Learning, Computer व Traffic Management या पूरक अभ्यासक्रमांचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच लाठी, शस्त्र हाताळणी तसेच गोळीबार, कमांडो या बाबींचेही प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणार्थींच्या सर्वांगीण शारीरिक प्रगतीसाठी जंगलकॅम्प व नाईट फायर, योगासने, प्राणायम व कराटे हे विषय समाविष्ठ केले आहेत.

प्रशिक्षण सत्र सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची चे प्राचार्य धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्राचार्य (प्रशासन) राजश्री पाटील व उप प्राचार्य (प्रशिक्षण) सुनिल शेटे यांनी योगदान दिले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button