
कुपवाड, ता. ७ : कौटुंबिक वादातून गौरी ऊर्फ ऋतुजा सुकुमार राजगे (वय २९, यशवंतनगर रोड, राजगुरूनगर, कुपवाड) ह्या सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या नवविवाहितेने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मृत गौरी यांचा विवाह यशवंनगर रोड, राजगुरूनगर मधील सुकुमार राजगे यांच्याशी झाला होता. शुक्रवारी (ता.६) रात्री कौटुंबिक वादातून गौरीने राजगुरूनगर येथील राहत्या घरातील पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच घटनास्थळी कुपवाड पोलिसांनी धाव घेतली. कुपवाड पोलिसांनी पंचनामा करून आयुष्य हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह शेवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
तणावाची परिस्थिती
घटना समजताच सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप करत तिच्या माहेरच्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तेथे तणावाचे वातावरण होते. नेतेमंडळी व नागरिकांची घटनास्थळी गर्दी होती.