
पुणे, ता.२ : पिंपरी सिगारेट मागण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून अक्षय संजय ठोके (वय २६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) या तरुणाचा सिमेंटच्या गट्टूने डोक्यात वार करून खून करण्यात आलेची घटना रविवारी (ता.१) पिंपरीतील विठ्ठलनगर परिसरात घडली. विश्वास भीमा शिंदे (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वंदना संजय ठोके (वय ४५) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अक्षय ठोके आणि विश्वास शिंदे विठ्ठलनगर येथे एकत्र बसले होते. त्यावेळी सिगारेट मागण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचा राग मनात धरून विश्वासने रस्त्यालगत पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून अक्षयच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली. या मारहाणीत अक्षय ठोके गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी संशयित विश्वास शिंदेला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.