
सांगली, ता.२ : जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश ७ जूनला बकरी ईद सण असून, त्या पार्श्वभूमिवर नियमांचे काटेकोर पालन करून हा सण उत्साहात साजरा करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक असून, जनावरांची अवैध कत्तल होणार नाही, याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, बकरी ईद सणासाठी जनावरांची वाहतूक होत असताना त्यांच्याकडे प्राधिकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र असल्याची तपासणी करावी. यासाठी पशुसंवर्धन विभागाने स्थानिक पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, परिवहन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक चेक पॉईंटवर जनावरांची वाहतूक नियमाप्रमाणे होत असल्याची तपासणी करावी. त्यातूनही जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सरकारी वकिलांची दिनांक ६ ते ८ जून २०२५ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.