सांगली : प्रतिनिधी

सांगली, ता.३० : जिल्ह्यात औद्योगिक विकास क्षेत्रात तपासणी करून अनाधिकृत प्लाँट सुरू असल्यास किंवा ज्या उद्योगामध्ये आवश्यक परवानगी न घेता बेकायदेशीर सॉल्वेंट व धोकादायक रसायनाचा किंवा केमिकलचा वापर केला जात असल्याचे आढळल्यास, अशा सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात रासायनिक अपघात (आपत्ती नियोजन, तयारी व प्रतिसाद) नियम, १९९६ अंतर्गत गठीत जिल्हा अरिष्ट समुह बैठकीत ते बोलत होते.
- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सूचना
- सर्व उद्योगांनी त्यांचे आपत्ती आराखडे नियमितपणे अद्ययावत करावेत.
- नियुक्त केलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष जे काम करावयाचे आहे त्याचे प्रशिक्षण वेळोवेळी द्यावे.
- अपघात होऊच नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
- आकस्मित मॉक ड्रिल घ्यावे.
- आपत्तीला सामोरे जाण्यासाठी असलेल्या साधनसामग्रीची तपासणी करावी.
- काही त्रुटी असल्यास त्या वेळीच दुरूस्त कराव्या किंवा त्या सुधाराव्यात.
- पूर्व सूचना प्रणाली (early warning system), घटना आदेश प्रणाली (Incident Command System) बारकाईने बघावी.
- आपत्ती काळात त्याचा प्रसार रहिवाशी भागात होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी.
- सर्व बाबींचे बारकाईने निरीक्षण करून त्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामध्ये समावेश करावा.
यावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सांगली चे सहायक संचालक प्र. अ. बोंदर यांनी रासायनिक अपघात हाताळण्याकरीता आपत्ती निवारण योजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले.

या बैठकीस औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कोल्हापूर सहसंचालक तथा जिल्हा अरिष्ठ समुह सचिव डॉ. अ. मो. अवसरे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सांगली चे सहायक संचालक प्र. अ. बोंदर, कोल्हापूर चे सहायक संचालक सु. वि. सुतार, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय अधिकारी इस्लामपूर श्रीनिवास अर्जून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.