- भव्य पालखी मिरवणुक: लिंगायत बांधवांचा सहभाग

कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड ता.१ : शहरातील वीरशैव लिंगायत समाज मंडळाच्यावतीने बुधवारी (ता.३०) जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने तसेच भव्य पालखी मिरवणूकीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या महादेव मंदिरात बुधवारी दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पहाटेच्या वेळी अभिषेक, सकाळपासून महिला मंडळातर्फे भजनी कार्यक्रम, दुपारी बारा वाजता लिंगायत समाजातील महिलांच्या उपस्थितीत जन्मकाळ साजरा करण्यात आला. सायंकाळी कुपवाड शहरातील सर्व मुख्य मार्गावरुन महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पुष्प माळानी सजवलेल्या पालखीतुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक राजेंद्र तोडकर, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, लिंगायत समाजाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याहस्ते व विविध मान्यवरांच्याहस्ते पार पडला.
- 🔴 मिरवणूक मार्ग
लिंगायत समाज महादेव मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. लिंगायत गल्ली, थोरला गणपती चौक, मिरज रोड, संत रोहिदास चौक, मुख्य रस्त्यावरुन नागराज चौक ते सोसायटी चौक, मंगळवार बाजार चौक, जमदाडे गल्ली, दर्गावेस, चावडी परिसर, माळी गल्ली, स्वामी व कुंभार गल्लीतून पुन्हा चावड़ीपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या भव्य मिरवणुकीत हजारो लिंगायत समाज बांधव सहभागी झाले होते. कुपवाड मुख्य रस्त्यावर मिरवणूक येताच शहरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी व संघटनाच्या पदाधिकाऱ्यानी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणूकीत लिंगायत समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पालखीसमोर फटाक्यांची आतषबाजी, मिरवणूकीचे खास आकर्षण म्हणून अघोरी शिव तांडवनृत्य, शिवपार्वती विवाह सोहळा, घोडे, ठोल ताशा, करमणुकी बाहुल्या, लाईट शो, हालगी आणि बँडच्या निनादात निघालेली मिरवणूक कुपवाड़करांसाठी लक्षवेधी ठरली होती. चावड़ीजवळ मिरवणुकीची सांगता झाली. दरम्यान, बसवेश्वर जयंतीची आकर्षक मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यानी प्रचंड गर्दी केली होती. जयंती उत्साहात पण शांततेत साजरी व्हावी, या उद्देशाने मिरवणूक मार्गावर कुपवाड पोलिसांनी कड़क बंदोबस्त तैनात केला होता.
या सर्व धार्मिक कार्यक्रमाचे संयोजन लिंगायत समाज मंडळाचे अध्यक्ष रविद पाटील, उपाध्यक्ष दरीकांत माळी, शिवगोंडा पाटील, पोपट तोडकर,सुभाष जमदाडे, प्रवीण पाटील, हेमंत बेळे, अनिल अथणीकर, महादेव स्वामी, सिदगोंडा पाटील, सुधीर पाटील, तेजस कुंभार, युवकचे प्रमुख सुजीत पाटील, अभिजित परीट, सचिन पाटील, विनय पाटील, प्रकाश पाटील, योगेश तोडकर, बसवराज पाटील, सौरभ पाटील, गिरीश पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी केले. यावेळी कुपवाड शहरातील लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होता.