सांगली : प्रतिनिधी


सांगली ता.३०: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्देश दिले की, अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा हे प्रशासनाचे ध्येय असून, त्यासाठी नार्को समन्वय केंद्र (एनकॉर्ड) समितीसह जिल्ह्यातील प्रत्येक संबंधित विभागाने टीम वर्क म्हणून सकारात्मकतेने व जबाबदारीने कार्यवाही करावी.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात झालेल्या नार्को समन्वय (एनकॉर्ड) समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

अंमली पदार्थ तपासणी करण्यासाठी आवश्यक किट न्यायवैधक प्रयोगशाळेच्या प्रादेशिक स्तरावरच उपलब्ध असतात. प्राथमिक तपासणीसाठी असे किट जिल्हास्तरावर उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देता येईल, असे सांगून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, राज्य शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे. या अनुषंगाने अंमली पदार्थ निर्मिती व विक्रीस आळा बसण्यासाठी परिसर पाहणी (फील्ड व्हिझिट) करून एक महिन्याच्या आत कारवाई करावी व तसा अहवाल समितीस सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, आरोग्य विभागाचे डॉ. मुजाहिद आलासकर, सहाय्यक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे, औषध निरीक्षक राहुल करंडे, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, पोलीस निरीक्षक (लोहमार्ग पोलीस) संभाजी काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वि. वि. किल्लेदार, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आदि उपस्थित होते.