कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता.२९ : कुपवाड एमआयडीसी मधील एका कारखान्यात परप्रांतीय मजुराचा खून झालेची घटना मंगळवार (ता.२८) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. इद्रिस गौरीशंकर यादव, वय २३ वर्ष, रा. शाहुपुर, उत्तर प्रदेश, सद्या राहणार लक्ष्मी इंडस्ट्रीज कुपवाड एमआयडीसी असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून कुपवाड पोलिसांनी दोन संशयित आरोपी वैभव सहदेव कांबळे, वय २१ वर्ष, रा. सलगर, चिदानंद मायाप्पा खोत, वय २२ वर्ष, रा. सलगर ( सद्या दोघेही राहणार लक्ष्मी इंडस्ट्रीज कुपवाड एमआयडीसी ) यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या अधिक माहितीनुसार काही दिवसापूर्वी मयत इद्रिस यादव हा कामासाठी आला होता. त्यांचा मेन कॉन्ट्रॅक्टर दिलीप राऊत हे असून दिगंबर भरत कांबळे यांच्याकडे तो कामास होते. कुपवाड एमआयडीसी मधील लक्ष्मी इंडस्ट्रीज या कंपनीच्या फॅब्रिकेशनच्या कामासाठी इंद्रिस यादव, वैभव कांबळे, चिदानंद खोत व अजय पटेल हे चौघेजण आले होते. चौघांना लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये दोन खोल्या राहण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मंगळवार (ता.२८) रात्रीच्या सुमारास परप्रांतीय कामगार इद्रिस गौरीशंकर यादव व वैभव कांबळे, चिदानंद खोत यांच्यात जेवण लेट का बनवले व चपात्या भाजल्या नाहीत या कारणावरून वादनिर्माण झाला. या वादावादीत वैभव कांबळे व चिदानंद खोत या दोघांनी इद्रिसला शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहणीत इद्रिस यादव याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक दिपक भांडवलकर, उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे आणि कुपवाड पोलिसांनी धाव घेतली. अवघ्या काही तासातच कुपवाड पोलिसांनी दोघा संशयित्यांना ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.