
सांगली, दि.२७ : सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच उज्वल भवितव्यासाठी फायदेशीर योजना आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत आपल्या १० वर्षाच्या आतील मुलीचे सुकन्या समृद्धी खाते काढून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन सांगली डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक बसवराज वालिकार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
केंद्र शासनाने भारतीय टपाल विभागामध्ये सुकन्या समृद्धी योजना दिनाक २२ जानेवारी २०१५ पासून सुरु केलेली आहे. यावर्षी या योजनेस दहा वर्ष पूर्ण झालेली असून सांगली जिल्ह्यातील अनेक पालकांनी आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले आहे.
आजपर्यंत सांगली टपाल विभागात एकूण ९३ हजार २३५ खाती उघडलेली आहेत.
क्षेत्रीय स्तरावरती भारतीय टपाल विभागामार्फत महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन मोहिमेचा भाग म्हणून १० वर्षाखालील मुलींची सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये दिनांक १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुकन्या समृध्दी योजनेची खाती उघडण्यात येणार आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा.