
कुपवाड : सोमवार दि.१६/०९/२०२४ रोजी कुपवाड शहर मराठी पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार सदस्य यांच्यावतीने पत्रकार ऋषिकेश माने यांना बेदम मारहाण प्रकरणी संबधीत दोषींची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली.
दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दैनिक सकाळचे कुपवाड शहर पत्रकार ऋषिकेश माने यांना अहिल्यानगर परिसरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच अन्य त्यांच्या काही चार ते पाच साथीदारांनी संगनमत करून ऋषिकेश माने यांना घराबाहेर बोलवून ‘आमच्या विरोधात चुकीची बातमी का लावलास’ अशी विचारणा करत राग मनात धरून शिवीगाळ केली.
तसेच यावेळी ऋषिकेश माने यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली.
यावेळी भांडणे मिटविण्याचा प्रयत्न करणारे माने यांच्या आई-वडिलांनाही मध्यस्थी करत असताना धक्काबुक्की केली. याबद्दल आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिलास तर जीवे मारण्याची धमकीही संबंधित हल्लेखोर यांनी ऋषिकेष माने यांना दिली.
याप्रकरणी ऋषिकेश माने यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेवून मारहाण करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी कुपवाड पोलीस सहा.पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच पालकमंत्री सुरेशभाऊ खाड़े यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित कुपवाड शहर मराठी पत्रकार संघटना कुपवाड, यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी दरिकांत माळी, महालिंग सरगर, श्रीकांत मोरे, मच्छिंद्र कांबळे, अभिजित परीट, हुसेन मगदूम, नजीर बारगीर, बाळासाहेब मलमे, भारत कांबळे, संदीप कांबळे, अनिल अथणीकर, समाधान धोतरे, सुभाष पाटील, प्रविण मिरजकर, अमोल हांडे, श्रीकांत यमगर आदी उपस्थित होते.