
मिरज पूर्व भागातील एका बड्या वस्त्र निकेतनवर शासकीय यंत्रणेने मारलेल्या धाडीचे पुढं काय झालं? असा प्रश्न या व्यवसायातील उद्योजक विचारत असून सर्वसामान्य उद्योजक विक्रेत्यांना डबघाईला आणणाऱ्या या वस्त्रनिकेतनच्या कारवाईला केराची टोपली दाखवण्यात आली काय? असा संशयही या क्षेत्रातील व्यवसायिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. मिरज पूर्व भागातील कपड्याच्या व्यवसायात स्वतःचा डंका पिटणाऱ्या एका वस्त्र निकेतनवर ऐन दिवाळीच्या कालावधीत सरकारी यंत्रणेने छापेमारी केली होती.
ही छापेमारी शासनाचा कर बुडवल्याप्रकरणी जीएसटी व आयकर विभागाकडून करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र ही कारवाई अवघ्या काही दिवसात गुंडाळल्यानंतर, पुन्हा आहे त्या जोशात हे वस्त्र निकेतन चालूच आहे. त्यातून खरोखरच शासनाला महसूल मिळतो का? याबाबत या क्षेत्रातील अन्य व्यावसायिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
कारण गावोगावी कर भरून हा व्यवसाय करणारे छोटे-मोठे कापड व्यावसायिक या होलसेल धंदा करणाऱ्या वस्त्र निकेतनमुळे अक्षरशः कंगाल झाले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ऐन सणासुदीच्या काळात या वस्त्र निकेतनवर कारवाई झाल्याने कापड व्यवसायातील व्यवसायिकांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले होते.
मात्र या कारवाईचे पुढे काय झाले? असा अजूनही यक्षप्रश्न या उद्योगातील व्यवसायिकांपुढे आहे. कारण ही कारवाई ईडीप्रमाणे मॅनेज होऊन गुंडाळण्यात आली काय? अशी शंका जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.