
कुपवाड : गुरुवार दि.29 ऑगस्ट 2024 रोजी कुपवाडमधील अकुज इंग्रजी माध्यमिक शाळेतील मुला- मुलींनी कायदेविषयक ज्ञानाचे धडे घेण्यास कुपवाड पोलीस ठाण्यास भेट दिली. शाळकरी मुलांनी पोलिसांसोबत मनमोकळा संवाद साधला.

मुलांनी कुपवाड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्यासह अंमलदारांशी कायदेविषयक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील ठाणे अंमलदार, बारनिशी, गुन्हे, बिनतारी संदेश, कोठडी, मुद्देमाल, दफ्तरी व हजेरी सर्व कक्षांच्या कार्याची त्यांनी सविस्तररित्या माहिती घेतली.
विद्यार्थ्यांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती पोलिसांनी मुक्त व निःसंकोचपणे दिली. प्रभारी अधिकारी कक्षात पोलिसांशी विद्यार्थ्यांच्या सवाल-जवाबाची चर्चा चांगलीच रंगली. सपोनि भांडवलकर यांचेसह संजय पाटील, प्रदीप भोसले, चांदणी दाभाडे यांनी मार्गदर्शन केले.

मुलांशी संवाद साधताना सपोनि.दिपक भांडवळकर म्हणाले की; विद्यार्थ्यांनी एखाधे ध्येय ठेवून ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न व मेहनत केली पाहिजे. आई-वडील, शिक्षक व गुरूसमान व्यक्तींचा आदर सन्मान ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरारी मारून आपली ध्येये गाठली पाहिजे.
पोलीस समाजाच्या सुरक्षेसाठी आहेत. आपल्या सभोवताल किंवा परिसरात एखादी चुकीची घटना किंवा टवाळखोर त्रास देत असतील तर बेधडक पोलिसांना सांगावे. जर का आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी हेल्पलाईन 112 नंबरचा वापर करावा. संकष्टग्रस्त बालकांनी त्वरित मदतीकरिता चाईल्ड हेल्पलाईन 1098 नंबरचा वापर करावा. समाजाच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज आहे.