ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन……

सांगली दि. 20 : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
योजनेसाठी अटी*
पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा, असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालाच्या सहायक संचालक धनश्री भांबुरे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा……
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करुन घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 43 हजार रूपये इतकी रक्कम लाभाच्या स्वरुपात वितरीत केली जाणार आहे.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी अर्ज सादर करणे सुरू असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
तर उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष साठी अर्ज सादर करणे 5 ऑगस्ट पासून सुरू असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
अर्ज कुठे करायचे?
या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क करावा. या योजनेअंतर्गत अर्ज महाविद्यालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे श्रीमती भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.