
ईश्वरपूर | प्रतिनिधी, ता.२३ : स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत वाळवा तालुक्यातील बोरगावने पुन्हा एकदा आपला झेंडा संपूर्ण राज्यात फडकवला आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या गटात बोरगावने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून, दीड कोटी रुपयांचे घवघवीत बक्षीस गावाला मिळाले आहे. मुंबईतील वरळी येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात वनमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
गट-तट विसरून गाव झाले एकवटले
राजकीय गट-तट, गरीब-श्रीमंत आणि जाती-धर्माचे भेद दूर सारून बोरगावच्या ग्रामस्थांनी केवळ गावच्या विकासाचा ध्यास घेतला. स्वच्छता अभियान असो वा वसुंधरा अभियान, बोरगावकरांच्या सक्रिय सहभागामुळेच आज हे यश मिळाले आहे. लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून गावात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पर्यावरण रक्षणाचे काम सुरू होते.
पुरस्कार स्वीकारताना बोरगावचे शिलेदार
वरळी येथील कार्यक्रमात सरपंच जितेंद्र पाटील, सदस्य सूर्यकांत पाटील, सचिन पाटील, राजेंद्र वाटेगावकर, आशिष शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी आर. पी. रजपूत आणि कर्मचारी गजानन कोगनुरे यांनी सन्मानपूर्वक हा पुरस्कार स्वीकारला.
या कामांची झाली दखल:
पर्यावरण जतन: वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी केलेली उल्लेखनीय कामगिरी.
स्वच्छता: प्लास्टिकमुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले.
लोकसहभाग: अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शिक्षक आणि आरोग्य विभागाचा सक्रिय सहभाग.
शैक्षणिक उपक्रम: शाळांमधून पर्यावरण जागृतीचे कार्यक्रम.
गाव झाले आदर्श: सरपंच जितेंद्र पाटील
पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सरपंच जितेंद्र पाटील म्हणाले, “हे यश माझे एकट्याचे नसून संपूर्ण गावातील नागरिकांच्या कष्टाचे फळ आहे. बोरगावने आपले नाव राज्याच्या नकाशावर एक ‘आदर्श गाव’ म्हणून कोरले आहे. या दीड कोटींच्या निधीतून गावचा विकास अधिक वेगाने करू.”
या यशामुळे वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाने घेतले जात आहे. गावातील या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बक्षीस रक्कम: १ कोटी ५० लाख रुपये
मान्यवरांची उपस्थिती: उपसरपंच सचिन देसाई, सचिन पाटील, सूर्यकांत पाटील, आशिष शिंदे, राजेंद्र वाटेगावकर आणि ग्रामपंचायत कर्मचारी.