
मिरज | प्रतिनिधी, ता.१० : म्हैशाळ रोडवरील हॉटेल टर्निंग पॉईंट येथे कोयत्याचा धाक दाखवून भरदिवसा लुटमार करणाऱ्या टोळीचा मिरज शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास मिरज- म्हेशाळ रस्त्यावरील ‘हॉटेल टर्निंग पॉईंट’मध्ये दोन अज्ञात तरुणांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून प्रवेश केला होता. त्यांनी हॉटेलचे चालक प्रथमेश पाटील आणि त्यांचे वडील राजेंद्र पाटील यांना कोयत्याचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. त्यानंतर गल्ल्यातील १२ हजार ३०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
पोलिसांचा तपास आणि अटक
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक किरण चौगुले व सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि गोपनीय खबऱ्यांकडून माहिती मिळवली. मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून खालील चार संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नावे दाउद सलाती, आयान जगादार, सालिम भोकरे, आकिब पठाण असे आहेत.
९२ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता, विळा, दोन दुचाकी आणि लुटलेली रोकड असा एकूण ९२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे दरोडा टाकणाऱ्या टोळीला जेरबंद केल्यामुळे मिरज शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या टोळीने अजून कुठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.