
सांगली, ता.८ : प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन बस स्थानकावर महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. खरसुंडी बस स्थानकावर वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या एका महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, तिच्याकडून ३ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
(ता.१) रोजी फिर्यादी अरुणा राजाराम सूर्यवंशी (वय ६७, रा. कराड) या खरसुंडी बस स्थानकावरून प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमधील प्रचंड गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबवले होते. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा (बीएनएस कलम ३०३ (२)) दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांनी दिले होते. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार हणमंत लोहार आणि सुनील जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, शारदा बंटी हतळणी (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) या महिलेने ही चोरी केली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी महिलेला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी महिलेने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, महिला पोलीस अंमलदार मनीषा पवार आणि सिकंदर वर्धन यांनी तिला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, तिने खरसुंडी बस स्थानकावर चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडे असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅगमधून ३ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली: पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि सिकंदर वर्धन व अंमलदार , हणमंत लोहार, बसवराज शिरगुप्पी, संजय पाटील, उदय साळुंखे, प्रतीक्षा गुरव, दुर्गा कुमरे, सुनील जाधव, प्रमोद साखरपे, अभिजित ठाणेकर, चालक कांबळे आणि मनीषा पवार यांनी केली.
अटक करण्यात आलेली आरोपी महिला आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे. सांगली पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रवाशांना आवाहन: बस स्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दीत प्रवास करताना आपल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.