
सांगली, ता.११ जानेवारी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवैध साठवणूक आणि तस्करीविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयाजवळ अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी एका पिकअप जीपवर छापा टाकून तब्बल २४ लाख ९० हजार ४४० रुपयांचा सुगंधी तंबाखू आणि पानमसाला जप्त केला. या कारवाईत एकूण ३० लाख ९० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, निवडणुकीच्या काळात प्रतिबंधित पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे पथक तैनात आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलेगर यांना एका पिकअप जीपमधून (MH 10, CR 6460) मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार सांगलीवाडी येथे सापळा रचून ही गाडी थांबवण्यात आली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, त्यात ४१ मोठी पोती आणि २१ बॉक्समध्ये भरलेला प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी गाडी चालक विश्वास भारत शिंदे (वय २५, रा. मिरज एमआयडीसी, मूळ रा. जत) याला जागीच ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपासाअंती या तस्करीमागे मोठे रॅकेट असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी उत्पादक आणि पुरवठादारांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेले संशयित:
१. विश्वास भारत शिंदे (चालक – अटक)
२. आनंदकुमार परशुराम बालदी (उत्पादक)
३. जितेंद्र कुमार प्रजापती (उत्पादक)
४. उमेश पाटील (पुरवठादार, रा. कुडची)
५. अतुल कश्यप (पुरवठादार, रा. हुबळी)
प्रशासनाची मोठी झडती
अन्न सुरक्षा अधिकारी धनंजय आघाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सांगली शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जप्त केलेल्या साठ्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा समावेश आहे. निवडणुकीच्या धामधुमीत मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी किंवा छुप्या विक्रीसाठी हा साठा आणला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर करत आहेत. हा साठा नेमका कोठे पोहोचवला जाणार होता आणि यामध्ये सांगलीतील आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रशासनाचा इशारा: अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर तस्करीवर कडक लक्ष ठेवले जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.