
मिरज, २८ नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे थकित हप्ते तातडीने मिळावेत, या मागणीसाठी आज (ता.२८) मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार पक्ष) च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सचिन दादा कांबळे आणि मनोज बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण होऊनही गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना थकित हप्ते मिळालेले नाहीत. यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
लाभार्थ्यांना त्यांचे थकित हप्ते तात्काळ देण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी मिरज तालुक्यातील लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना सचिन दादा कांबळे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. “येणाऱ्या आठ दिवसांत या सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचे थकित हप्ते तत्काळ मिळाले नाहीत, तर पुढील काळात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,” असे ते म्हणाले. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.