
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीतील जुन्या वादातून निर्घृण खून झाल्याचे उघड; तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धुळगाव, २७ नोव्हेंबर : तासगाव तालुक्यातील डुबल धुळगाव येथील राजीव गौतम खांडे, वय ३८ वर्ष, यांच्या खुनाचा छडा अवघ्या चार तासांत सांगली स्थानिक गुन्हे शाखेने लावून चार संशयीत आरोपींना केले जेलबंद. आंनद ऊर्फ विनोद प्रशांत लोखंडे, वय १९ वर्षे, रा. सोनी, ता. मिरज, आयुश परशुराम कांबळे, वय २२ वर्षे, रा. जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर सध्या रा. धुळगाव ता. मिरज, गिरीश कुमार ऊर्फ मारी गुंडाराज चंदनशिवे, वय १९ वर्षे, रा. सोनी, ता. मिरज आणि विशाल माणिक धेंडे, वय २७ वर्षे, रा. धुळगाव, ता. तासगाव असे जेलबंद केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. हा खून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या जुन्या भांडणातून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (ता. २६) रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास धुळगाव ते सांबरवाडी रोडवरील घोलाचा ओढ्याजवळ अनोळखी आरोपींनी राजीव खांडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी फिर्यादी गौतम शिवा खांडे यांच्या तक्रारीवरून तासगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस प्रमुख संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक नेमले. पथकतील सागर लवटे यांना गोपनीय माहिती मिळाली की, चार संशयित आरोपी सिद्धेवाडी खण येथील रत्नागिरी-नागपूर हायवेच्या ब्रिजखाली लपून बसले आहेत. सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपींनी खुनाची कबुली दिली. विशाल माणिक धेंडे (रा. धुळगाव) हा मुख्य सूत्रधार आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत पुढे-पुढे करण्याच्या कारणावरून मयत राजीव खांडे यांच्यासोबत त्याचे भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून, धेंडेने आपले साथीदारांच्या मदतीने राजीव खांडे यांचा खून केला. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पुढील अधिक तपास तासगाव पोलीस करत आहे.
सदर कारवाई पोलीस प्रमुख संदीप घुगे व अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ सतीश शिंदे, सपोनि/ पंकज पवार ,सागर लवटे, नागेश खरात, अनिल कोळेकर, संदीप नलावडे, सागर टिंगरे, दरिया बंडगर, संदीप गुरव, सतिश माने, मच्छिद्र बर्डे, अभिजीत ठाणेकर, उदयसिंह माळी, अमिरशा फकीर, अमर नरळे, महादेव नागणे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, अभिजीत पाटील आदींनी केली.