माधवनगर ते कुमठा फाटा रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका वाढला

ऊस वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांकडून तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी

सांगली, दि. ०८ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील माधवनगर ते कुमठा फाटा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि शेतकऱ्यांच्या वाहतुकीला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजूचे काम पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या बाजूचे काम अपूर्ण राहिल्यामुळे रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

सध्या सांगली साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने या मार्गावर ऊस घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि अन्य अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. रस्त्याच्या अर्धवट स्थितीमुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, एकेरी वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना अनेकदा लहान-मोठे अपघात होत आहेत.

या रस्त्यावर वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेज, वसंतदादा इंग्लिश स्कूल, जिजामाता हायस्कूल, बुधगाव शाळा नंबर एक आणि बुधगाव हायस्कूल यांसारख्या अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी याच रस्त्यावरून ये-जा करतात. रस्त्याची दुरवस्था आणि वाढलेले अपघातांचे प्रमाण पाहता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

नागरिकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने मागणी केली आहे की, नागरिकांची गैरसोय आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी माधवनगर ते कुमठा फाटा या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरात लवकर आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button