सांगली महानगरपालिकेत नोकरीचे आमिष; कनिष्ठ लिपिक पदाचे खोटे नियुक्ती पत्र देऊन तरुणाला ३.४० लाखांचा गंडा

सांगली, दि. ४ नोव्हेंबर : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये (SMKC) ‘कनिष्ठ लिपिक’ पदावर नियुक्ती करून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महापालिकेने स्वतः पुढाकार घेऊन मुख्य आरोपी दिनेश पुजारीविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नेमकी घटना काय?

खणभाग येथील वैभव रावसाहेब दानोळे यांना आरोपी दिनेश पुजारी याने गाठले. पुजारीने महापालिका आयुक्तांशी आपले जवळचे संबंध असल्याचे खोटे सांगत, भरती प्रक्रियेतून कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती मिळवून देतो, असे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून दानोळे यांनी आरोपीला टप्प्याटप्प्याने ३,४०,०००/- इतकी मोठी रक्कम दिली.पैसे मिळाल्यानंतर, आरोपी दिनेश पुजारी याने दानोळे यांना अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरी असलेला ‘कनिष्ठ लिपिक’ पदाचा बोगस नियुक्ती आदेश आणि महापालिकेचे खोटे ओळखपत्र (ID Card) दिले. महापालिकेच्या चौकशीत हे नियुक्ती पत्र, स्वाक्षरी, मजकूर आणि ३५,०००/- रकमेची सुरक्षा अनामत पावती पूर्णतः बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. ही बाब उघडकीस येताच महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. आयुक्त गांधी यांनी तातडीने नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे.

“महानगरपालिकेत सध्या कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू नाही. नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नागरिकांनी बळी पडू नये. महापालिकेच्या सर्व अधिकृत सूचना केवळ आमच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्या जातात. अशा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यापूर्वी नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधून सत्यता पडताळून पाहावी.

आयुक्त सत्यम गांधी

अन्य दोघांनाही फसविले! या प्रकरणाच्या चौकशीत, आरोपी दिनेश पुजारी याने केवळ दानोळे यांनाच नव्हे, तर नरसोबावाडी आणि तासगाव येथील अन्य दोन व्यक्तींनाही अशाच प्रकारे खोटे नियुक्ती पत्र दिले असल्याचे समोर आले आहे.महापालिका प्रशासनाने तातडीने पाऊल उचलत, सहाय्यक आयुक्त (मध्यवर्ती आस्थापना कक्ष) तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी श्री. विनायक शिंदे यांच्यामार्फत, आयुक्त महोदयांच्या मान्यतेने आरोपी दिनेश पुजारी याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्याची लेखी विनंती केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button