
सांगली, ता.२ : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी चालना मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) २०२४-२५ च्या निधीतून मंजूर झालेल्या अनेक प्रमुख रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण होत असून, २०२५-२६ साठी नवीन प्रस्तावांची तयारीही सुरू झाली आहे. यासोबतच, ‘नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम’ (NCAP) अंतर्गत तिन्ही शहरातील प्रमुख चौकांचा कायापालट करण्याची मोठी योजना हाती घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी आज दिली.
प्रगतीपथावरील मुख्य रस्ते (२०२४-२५):
आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडमध्ये यशवंत नगर चौक ते अंवा चौक, लक्ष्मी मंदिर ते सूतगिरणी चौक, आणि संत रोहिदास चौक ते एमआयडीसी जकात नाका या रस्त्यांची कामे सुरू आहेत. सांगली शहरात, पुष्पराज चौक ते आपटा पोलीस चौकी, विश्रामबाग परिसरातील रस्ते, शामराव नगर चौक ते अब्दुल कलाम कॉलेजपर्यंतचा रस्ता आणि वॉर्ड क्र. ११ मधील १०० फुटी रस्त्याच्या कामाचा यात समावेश आहे. मिरजेतही चिवटे हॉस्पिटल ते वंटमुरे कॉर्नर या महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
नवीन वर्षाचे नियोजन (२०२५-२६):
पुढील वर्षाच्या नियोजनात मिरज शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, प्रभाग क्र. ३ आणि ४ मधील अंतर्गत रस्ते तसेच एमआयडीसी परिसरातील उद्योगांसमोरील मुख्य रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
‘NCAP’ अंतर्गत चौकांचे सुशोभीकरण:
शहरातील प्रदूषण नियंत्रणासोबतच सौंदर्यीकरण वाढवण्यासाठी ‘नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम’चा निधी वापरला जाणार आहे. यातून सांगलीतील कॉलेज कॉर्नर, सिव्हिल हॉस्पिटल, विश्रामबाग गणपती मंदिर, काँग्रेस कमिटी व झुलेलाल चौक, कुपवाडमधील लक्ष्मी मंदिर चौक आणि मिरजेतील महात्मा गांधी चौक यांचा विकास केला जाईल. यामध्ये आकर्षक लँडस्केपिंग, आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि डेकोरेटिव्ह लाईटिंगचा समावेश असेल.
खड्डे दुरुस्ती वेगात:
शहर अभियंता श्री. पृथ्वीराज चव्हाण व उपअभियंता श्री. महेश मदने यांच्या देखरेखीखाली शहरातील खड्डे बुजवण्याचे कामही वेगात सुरू आहे. आतापर्यंत २३ रस्त्यांची ‘दोष दायित्व कालावधी’ (DLP) अंतर्गत दुरुस्ती पूर्ण झाली आहे. तसेच, १६ किमी खडीकरण (मुरूम) पॅचवर्क आणि ५ किमी डांबरीकरण पॅचवर्क पूर्ण झाले असून, उर्वरित सर्व कामे नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यावर बोलताना आयुक्त श्री. सत्यम गांधी म्हणाले, “दर्जेदार रस्ते, सुबक चौक आणि स्वच्छ हवा या त्रिसूत्रीवर महापालिका भर देत आहे. नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी सर्व कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”