“पलूसचा नगराध्यक्ष भाजपचाच होईल!” ५०० कोटींच्या कोरियन गुंतवणुकीसह विकासाचा संकल्प; मंत्री चंद्रकांतदादा पाटलांचा विश्वास

सांगली, ता.१: (पलूस) आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पलूस येथे भारतीय जनता पक्षाचा ‘विजय संकल्प मेळावा’ उत्साहात पार पडला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात नगराध्यक्षपद जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन झाले नाही, तर पलूस तालुक्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा रोडमॅपही सादर करण्यात आला.

शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
शुक्रवारी (ता. ३१) रोजी झालेल्या या मेळाव्यात भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याशिवाय, पलूस शहरातील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विधान परिषद आमदार मा. सदाभाऊ खोत, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. सम्राट बाबा महाडिक, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. शरदभाऊ लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


५०० कोटींची गुंतवणूक आणि एमआयडीसीचा विस्तार
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी पलूसच्या विकासाचा आपला दृष्टीकोन स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, १९९७ मध्ये पलूस तालुक्याची निर्मिती माझ्या आमदारकीच्या काळात झाली, कारण या भागामध्ये औद्योगिक विकासाची प्रचंड क्षमता आहे. ते म्हणाले, “पलूसला प्रगतीचा आदर्श बनवण्याचा आमचा संकल्प आहे. याच दिशेने आम्ही पुढे जात आहोत. लवकरच ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणारी कोरियन कंपनी पलूसमध्ये येत आहे. तसेच, स्थानिक लघुउद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्र वायनरीसाठी खुलं करण्याची प्रक्रिया सुरू आहे.” यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि ‘माणुसकीचा लढा’
यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला. “माझ्याकडे सत्ता नाही, पैसा नाही, पण माझ्याकडे कार्यकर्त्यांचा नितांत विश्वास आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले. “गेल्या काही निवडणुकांमध्ये पराभव झाला असला तरी आमची मतसंख्या सातत्याने वाढत आहे. कार्यकर्त्यांनी निष्ठेने लढा दिला आहे. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आगामी निवडणुकीत पलूसचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाच होईल, हा आमचा विजय संकल्प आहे,” असे ते म्हणाले. गोरगरिबांच्या जमिनींवर रस्त्याचं आरक्षण लादण्याचा अन्याय आम्ही संपवणार. ५,००० एकर द्राक्ष क्षेत्र असूनही पलूसला नुकसानभरपाईपासून वंचित ठेवले गेले. हा अन्याय मुख्यमंत्र्यांसमोर स्वतः मांडला आहे.

बाजारपेठेचे संरक्षण

विजापूर–गुहागर हायवेवरील पुलामुळे गावाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, आपण गडकरी साहेबांकडे पाठपुरावा करून तो पूल रद्द करून घेतला, ज्यामुळे आज आपली बाजारपेठ जिवंत आहे. सर्जेराव अण्णांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी रामनवमी, तिळगुळ भेट, दिवाळी भेट यांसारख्या उपक्रमांतून घराघरात भाजप पोहोचवला असून, हा मेळावा कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आणि विकासाच्या दृष्टीचा उत्सव असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष पद भाजपचे असले तरी विकासासाठी मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. “हा लढा माणुसकीचा, प्रामाणिकपणाचा आणि विकासाचा आहे, त्यामुळे पलूसमध्ये आपला विजय निश्चित आहे,” या शब्दांत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button