
मुंबई, ता.२८: धनगर समाजातील विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे, तर भारतीय संरक्षण दलात सामील होण्यासाठी आवश्यक असलेले सैनिकी प्रशिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने एक महत्त्वपूर्ण मागणी मा. मंत्री अतुल सावे यांच्याकडे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका विनंतीपत्राद्वारे केली आहे. संरक्षण मंत्रालय मान्यताप्राप्त सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांना ‘नामांकित इंग्रजी माध्यम शाळा प्रवेश योजने’प्रमाणेच शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी या पत्रात नमूद आहे.
सैनिक स्कूलमधील शिक्षण शुल्क (फी) उच्च असते. या उच्च शुल्कामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे पालक मुलांना सैनिक स्कूलमध्ये पाठवू शकत नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी, या शाळांच्या एकूण शुल्कापैकी किमान ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ७०,०००/- पर्यंतचे आर्थिक सहाय्य शासनाने करावे, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
या मागणीमुळे गरीब कुटुंबातील होतकरू धनगर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सैनिकी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ते केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर देशाच्या सेवेतही योगदान देऊ शकतील.
या महत्त्वाच्या मागणीचे विनंतीपत्र मंत्री अतुल सावे यांना सादर करताना, पडळकरांचे सहकारी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते. या मागणीवर शासनाने त्वरित विचार करून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
